विजय नगरातील नुकसान ग्रस्त कुटुंबीयांना आ. साजिद पठाण यांच्या वतीने आर्थिक मदत
शासनाकडून लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन
अकोला : सोमवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे विजय नगर भागात सिलिंडरचा स्फोट होऊन पाच घरांची राखरांगोळी झाल्याची घटना घडली होती. या घटनेत नुकसान ग्रस्त पाचही कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाची झळ पोहोचल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. याप्रकरणी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी मंगळवारी पुन्हा सदर नुकसान ग्रस्त कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत पाचही कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. तर शासनाकडून सुद्धा लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी कुटुंबीयांना दिले.
शहरातील विजय नगर परिसरात सोमवारी सकाळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत तेथील तब्बल चार ते पाच घरे जळून खाक झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. तर यावेळी नुकसान ग्रस्त कुटुंबीयांना सांत्वन करीत त्यांची विचारपूस केली. सदर प्रकरणी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत नुकसान ग्रस्तांना उचित मदत देण्याची मागणी सुद्धा आ. पठाण यांनी केली. तर पाचही कुटुंबीयांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी शेजारीच मनपाच्या वतीने बांधण्यात आलेला हॉल उघडा करून देत तिथे त्यांची व्यवस्था करून दिली. मंगळवारी दुपारी पुन्हा आ. साजिद पठाण यांनी विजय नगर परिसर गाठीत तेथील नुकसान ग्रस्त कुटुंबीयांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. तर यावेळी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात वैयक्तीक पातळीवर प्रत्येकी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. तसेच नुकसान ग्रस्तांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी हाजी सज्जाद हुसैन, रफिक सिद्दीकी, मो. फैय्याज, मोईन खान यांच्याहस्ते आर्थिक मदतीचे नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदत देण्यात आली. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.